नांदेडमध्ये दिवाळी पहाट रद्द करण्याची मागणी — पत्रकार कृती समितीचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

📍 नांदेड | दि. 17 ऑक्टोबर 2025
नांदेडमध्ये दिवाळी पहाट रद्द करण्याची मागणी — पत्रकार कृती समितीचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
नांदेड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या “दिवाळी पहाट” कार्यक्रमाला विरोध करत नांदेड जिल्हा पत्रकार कृती समितीने हा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पत्रकार कृती समितीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “पूरामुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत, घरं कोसळली आहेत आणि शासनाची मदत अपुरी पडत आहे. अशा वेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.”
समितीने सुचवले आहे की, “दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी ठरवलेला निधी हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जावा.”
विशेषतः ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, अशांना प्राधान्य देऊन या निधीतून मदत देण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
पत्रकार कृती समितीने प्रशासनाकडे सामाजिक भान राखण्याचे आवाहन करत म्हटलं आहे की, “शासनाने संकटग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्याचा पुढाकार घ्यावा, कार्यक्रमांवर पैसा खर्च न करता तो त्यांच्या मदतीसाठी वापरावा.”
या निवेदनादरम्यान अनेक स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🎙️ मनचाहा माईक इंडिया न्यूज | Manchaha Mic India News
📞 +91 7385475831 | +91 8421314193
🌐 https://manchahamicindia.com
📧 manchahamicindia@gmail.com


